मुंबई – १०० कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालया (ईडी)ने अटक केली आहे. ही अटकेची कारवाई दुर्दैवी आहे. अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना, त्यांना अटक होणे हेच मुळात दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांना अनिल देशमुख यांच्या अटकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी भाजप आणि परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केला. अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत असताना, त्यांना अटक होणे दुर्दैवी आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील, तर त्यांना कुणाची साथ आहे?, असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी विचारला. काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी होत आहे. हे आपण पाहिलं आहे. एखादा व्यक्ती चौकशी यंत्रणांना सहकार्य करत करताना, देखील अटकेची कारवाई करणं, हे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.