‘अनलॉक’नंतर महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ

  •  महिलांसाठी राजधानी दिल्ली असुरक्षितच
  •  गुन्ह्यांत ६ ते २० टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली – देशभरात मागील दोन वर्ष कोरोनाने हाहाकार माजवला. अशात सर्व काही सुरळीत होत असताना राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा महिलांवरील गुन्हे वाढू लागलेत. या गुन्ह्यांमध्ये ६ ते २० टक्के वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, अनलॉक प्रक्रियेनंतर विनयभंग व बलात्काराच्या घटनांमध्ये चक्क २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत १,४२९ बलात्काराचे गुन्हे नोंदवले आहेत, तर यावर्षी ऑक्टोबरपर्यंत १७२५ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. विनयभंगाच्या घटनांमध्ये २०.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत विनयभंगाचे २,१५७ गुन्हे दाखल झाले असून, गेल्या वर्षी १,७९१ गुन्हे दाखल झाले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनानंतर शहर अनलॉक झाल्यानंतर ही वाढ झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी बलात्काराच्या घटनांमध्ये २८ टक्के घट झाली होती. त्याचप्रमाणे विनयभंगाच्या घटनांमध्ये ३२.१९ टक्क्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २,१६८ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. जे गेल्या वर्षी २१ टक्क्यांनी घसरून १,६९९ वर आले. २०२० मध्ये दिल्लीत महिलांचे अपहरण आणि पळून जाण्याच्या एकत्रित २,३४४ प्रकरणे नोंदवण्यात आली. यावर्षी अशा ३,३४२ प्रकरणांची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, ९७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी पीडितांना ओळखत होते, तर सुमारे २ टक्के बलात्कार अनोळखी व्यक्तींकडून झाल्याची नोंद झाली आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्यास सांगितले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …