मुंबई – अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या उत्तर प्रदेशातील घरी आयकर विभागाला मोठे घबाड सापडले. आता या प्रकरणातील समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन यांच्या अनेक घरांवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. आयकर विभागाने कानपूर, कन्नौज येथे छापेमारी केल्यानंतर आता मुंबईतील तब्बल १४ ठिकाणी धाडी टाकत कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ८ व्यावसायिक आणि ६ रहिवासी ठिकाणांवर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मलाड याठिकाणीचा समावेश आहे. मुंबईतील मालाडच्या चिंचोली अशोक एन्क्लेव्ह इमारतीवर छापा टाकला आहे.
पुष्पराज जैन हे २०१६ मध्ये इटावा-फरुखाबाद येथून समाजवादी पक्षाकडून विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. ज्यांची मुदत नवीन वर्षाच्या मार्चमध्ये संपत आहे. आमदार पुष्पराज जैन यांच्या घरावर आयकर विभागाने शुक्रवारी छापा टाकला. छाप्यादरम्यान कोलकात्याच्या शेल कंपन्यांशी संबंधित माहिती मिळाली आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे बोगस भागभांडवल तयार करण्यात आले. जैन यांच्या मुंबईतील ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत. जैन यांचा मुंबईत रिअल इस्टेटचा व्यवसायही आहे. मुंबईत मलाड, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, याठिकाणी इन्कम टॅक्सची पथके छापे टाकत आहेत. करचुकवेगिरीच्या संशयावरून डीजीजीआय टीमने छिपट्टी मोहल्ला येथील रहिवासी पीयूष जैन यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर आणि कानपूरच्या निवासस्थानावर छापे टाकले. या पथकाने वडिलोपार्जित घरातून १९ कोटी रोख, २३ किलो सोने आणि ६०० किलो चंदन तेल जप्त केले आहे. तर कानपूरच्या निवासस्थानातून टीमला १७७.४५ कोटींची रोकड मिळाली. अत्तर व्यापाऱ्यांवर छापे टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शुक्रवारी लखनऊ येथील पथकांनी पानसारिया मोहल्ला येथे राहणारा अत्तर व्यापारी फौजान याच्या प्रतिष्ठानवर शुक्रवारी सकाळी ७ वाजता छापा टाकला. आयुब मोहम्मद, याकूबच्या जागेवर छापा टाकला. यासोबतच चुप्पटी मोहल्ला येथील एसपी एमएलसी पुष्पराज जैन यांच्या फॅक्टरीवरही पथकाने छापा टाकला. पथकासोबत मोठा पोलीस बंदोबस्तही आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आग्रा, लखनऊ, कानपूर, मुंबई येथेही छापे टाकले जात आहेत. सततच्या छाप्यांमुळे अत्तर व्यापारी धास्तावले आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, इतर अनेक परफ्यूम व्यापारीदेखील पथकाच्या रडारवर आहेत.