मुंबई – मुंबई पोलिसांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक फटांगडे यांच्यासह ७ जणांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मालवणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुरुलकर यांच्या तक्रारीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कुरुलकर यांनी पोलिसांना सांगितले की, मी ३० नोव्हेंबर २०१७ मध्ये निवृत्त झालो. त्याआधी जुलै २०१५ मध्ये माझी नियुक्ती स्पेशल ब्रांच-१ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी झाली. जुलै २०१५ ते नोव्हेंबर २०१७ मध्ये आम्ही एक यादी तयार केली होती. या यादीत त्यांनी पासपोर्ट तयार करण्यासाठी भारतीय नागरिकत्व असल्याचा पुरावा दिला. मात्र, त्यांचे दस्तावेज संशयास्पद होते. या तपासादरम्यान, रेश्मा खान नावाच्या महिलेने पासपोर्टसाठी दिलेले दस्तावेज आमच्यासमोर आले. तिने सादर केलेल्या दस्तावेजात जन्माचा दाखला होता. त्यावर २४ परगना पश्चिम बंगालमधील पत्ता होता. हा पत्ता पडताळणीसाठी एक पथक पाठवण्यात आले. मात्र, तिच्या जन्माच्या दाखल्याची नोंदच तिथे नसल्याचे आढळून आले. ही माहिती मला पडताळणी करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर मी मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगडे यांना याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी पत्र लिहिले. मात्र, फटांगडे हे रेश्माविरोधात गुन्हा दाखल करू देत नसल्याचे त्यावेळी तेथील पोलीस निरीक्षकाने मला तोंडी माहिती दिली असल्याचे कुरुलकर यांनी सांगितले. त्यानंतर देवेन भारती यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी त्यांनी रेश्माविरोधात गुन्हा दाखल न करण्यास सांगितले. गुन्हा दाखल केल्यास तुम्हाला त्रास होईल, या महिलेचा संबंध एका राजकीय नेत्यासोबत असल्याचे भारती यांनी मला सांगितले. कुरुलकर यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, या प्रकरणात ऑक्टोबर २०२० मध्ये मी माहिती अधिकार अंतर्गत या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची प्रत मागितली, त्यावर २०१८ पर्यंतची अनेक कागदपत्रे नष्ट झाली आहेत, असे उत्तर मिळाले. कुरुलकर यांच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी एडीजी देवेन भारती, निवृत्त एसीपी दीपक फटांगडे आणि कथित बांगलादेशी नागरिक रेश्मा हैदर खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा सध्या कुठे आहे, याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अजून कोणाचाही जबाब नोंदवण्यात आलेला नाही.