आजकाल राजकारणात वापरली जाणारी भाषा, प्रवृत्ती हे पाहता सहिष्णुता नावाची गोष्ट संपुष्टात आलेली आहे. मानसिक हिंसा करण्याची, दुखावण्याची, छल प्रवृत्ती, छद्मीपणा हा प्रकार फार वाढलेला दिसतो आहे. हे पाहताना आणि वाचतानाही खूप वाईट वाटते. अशा प्रवृत्तीने राजकारणाबाबत सामान्यांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण होताना दिसते आहे. थोर व्यक्तींच्या विटंबना, पुतळे, स्मृतिस्तंभाची विटंबना, धमक्या, अनादर करणे, टिंगली-टवाळी, नकला हे प्रकार अत्यंत हीन प्रवृत्तीचे प्रदर्शन करणारे आहेत. बंगळुरूमधील पुतळा विटंबना, त्याचे पडसाद येणे, मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी येणे, विविध मान्यवरांना धमकी येणे, हे वाढते प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गेल्या महिनाभरात मंदिर उडवून देण्याचे मेल, फोन आले होते. यावर गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. लांडगा आला रे आला, याप्रमाणे या पोकळ धमक्या आहेत, असे समजून गप्प बसण्यात काहीच अर्थ नाही. पण यावरून होणारे राजकारण आणि हिंसाचाराचे राजकारण हे खेदजनक आहे.
पंजाबमध्ये घडलेल्या ताज्या घटना देशातील सुजाण नगरिकांना अस्वस्थ करणाºया आहेत. कोणाच्याही श्रद्धास्थानाची कोणीही विटंबना करणे नक्कीच निषेधार्ह आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात कोणा युवकाने श्रद्धास्थानाची विटंबना केली. त्यानंतर जे घडले तेही भीषण होते. त्याच्या कृत्याने तेथील जमाव संतापला हे समजण्या सारखे आहे. त्याने त्या युवकास बेदम मारहाण केली. त्यात तो युवक मरण पावला. या घटनेस चोवीस तास उलटण्याच्या आत कपुरथळा जिल्ह्यातील एका गावातील गुरुद्वारातही अशीच घटना घडल्याचे वृत्त पसरले. तेथेही जमावाने त्या युवकास बेदम मारहाण केली. त्यात तोही मरण पावला. श्रद्धास्थानाच्या विटंबनेची दखल घेऊन सर्वांनी तिचा निषेध केला ते योग्य आहे, पण जमावाच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला, त्याविषयी कोणीही काही बोलले नाही याचे आश्चर्य वाटते. यावर सर्व राजकीय पक्ष त्यावर गप्प आहेत. पण असे धमकी देणारे, विटंबना करणारे कोण आहेत, कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, याचा विचार न करता कारवाई झाली पाहिजे. त्याचे राजकारण करण्याची गरज नाही. असे राजकारण करणे म्हणजे हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
कायदा हातात घेण्याची, निषेधाच्या नावाखाली संपवण्याची प्रवृत्ती वाढीस लागते आहे. पंजाबात त्या दोन तरुणांना पोलिसांत पकडून दिले असते, तर ते नेमके कोण आहेत, त्यांच्यामागे कोणाचा हात आहे हे तपासात समोर आले असते. पण जमावाकडून ते मारले गेले. सुवर्ण मंदिरातील घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीची अजूनही ओळख पटलेली नाही, तर कपुरथळा जिल्ह्यातील घटनेतील संशयित आरोपी स्थलांतरित मजूर असल्याचे समोर आलेले आहे. २६/११ च्या मुंबईतील हल्ल्यात तुकाराम ओंबळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कसाबला पकडले, त्याला घट्ट पकडून ठेवले म्हणून त्याचे पाकिस्तान कनेक्शन पकडता आले. सगळ्या प्रकाराचा तपास करता आला. पण आजकाल अशा प्रवृत्तींना पकडून त्यांचा बुरखा फाडण्याचे काम करण्याऐवजी तिथल्या तिथे निवाडा केला जातो हे फार हिंसक आहे. आता हे दोन्ही आरोपी मारले गेल्याने त्यांचा हेतू कधीच कळणार नाही. मृतांची बाजू कोणी घेणार नाही; पण जमावाने त्यांची हत्या करणे म्हणजे जमावाने कायदा हाती घेणे आहे हेही कोणी बोलत नाही. त्याविषयी सर्व पक्ष मौन बाळगून आहेत याचे जास्त आश्चर्य वाटते. हे हिंसक राजकारणाचे द्योतक आहे.
आता काही राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होत आहेत. त्यात पंजाबही आहे. मतदारांना जपण्यासाठी धार्मिक बाबीत न बोलण्याचे सर्व पक्षांनी ठरवलेले दिसते. भारतात धर्म हा अजूनही संवेदनाक्षम मुद्दा आहे. काही राज्यांत तर ती जास्त नाजूक बाब आहे. ८०च्या दशकात पंजाबातच धर्माच्या मुद्यावर फुटीरतावादी चळवळ फोफावली होती. हे विसरता कामा नये. बटाला येथील गुरुद्वारात एकाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता, पण तेथे विटंबना झाली नसल्याने त्याची तक्रार दाखल झाली नाही. पण ही तक्रार घेणे गरजेचे होते. एकाचवेळी अशा घटना अनेक ठिकाणी का केल्या जातात? यामागचे नियोजन कोणाचे हे तपासण्याची गरज आहे. पण अशा तक्रारी न घेणे, तपासाची जबाबदारी झटकणे हे पण हिंसकतेला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे.
पंजाबात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्याच्याअगोदर या घटना घडणे संशयास्पद आहे. जमावाने केलेल्या हत्येविषयी राजकीय नेतृत्वाने मौन बाळगणे धोकादायक आहे. त्यामुळे हिंसक जमावास बळ मिळेल. तपास यंत्रणा व न्याय संस्था यांना न जुमानता परस्पर न्याय देण्याची वृत्ती बळावेल. दोन वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशात पोलिसांनी एन्काऊंटर करून बलात्काºयाला मारले होते. हा परस्पर न्यायदानाचा प्रकार अनेकांना सुखद वाटला, तरी ते कितपत योग्य आहे याचाही विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे आता आगामी काळातील निवडणुकांमध्ये प्रचाराच्या काळात श्रद्धास्थानांची विटंबना हाच महत्त्वाचा मुद्दा बनू शकतो. ते राज्याच्या दृष्टीने अधिक गंभीर ठरेल. त्यामुळे या हिंसकतेला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आ रेला का रे असले, तरी राजकारणात शत्रूत्वाची, तिरस्काराची वाढती प्रवृत्ती हे चांगले नाही. कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेणे, परस्परांची मते समजून घेण्याचे तत्व सांभाळण्याची गरज आहे.
One comment
Pingback: trippy treats chocolate bar