ठळक बातम्या

अग्रलेख : सुटला एकदाचा

अखेर शाहरूख खानचा मुलगा आर्यनला जामीन मंजूर झाला आणि शनिवारी तो सुखरूप घरीही आला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने सुटकेचा नि:श्वास सोडला, कारण माहिती आणि जगात काय चालले आहे, यासाठी लोक साधारणपणे टीव्ही पाहतात. जगातल्या घडामोडी कळतील, बातम्या कळतील; पण आमच्या वृत्तवाहिन्यांनी गेल्या पंचवीस दिवसांत आर्यन खानशिवाय काही जगात महत्त्वाचे असूच शकत नाही, असाच समज करून घेतला होता. त्यामुळे त्या मन्नतपासून ते तुरुंगापर्यंत धापा टाकत वाहिन्यांचे पत्रकार दमछाक होईपर्यंत पळत होते आणि वृत्तांकन करत होते. दुसरीकडे सकाळ उजाडली की, नवाब मलिक यांची पत्रकार परिषद. याशिवाय टीव्ही वाहिनींवर काहीच दिसत नव्हते. आर्यनला अटक आणि त्याशिवाय महाराष्ट्रात काहीच घडले नाही का? हे अत्यंत हिडीस आणि चिंताग्रस्त असे वातावरण वाहिन्या आणि समाजमाध्यमांमध्ये तयार झाले होते. ते अत्यंत घातक आहे. दोनच महिन्यांपूर्वी न्यायालयानेही याबाबत चिंता व्यक्त केली होती.

आज भारतातील माध्यमे, विशेषत: दूरचित्रवाहिन्या व समाजमाध्यमे यांवर दोनच महिन्यांपूर्वी सर न्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी केलेली टिप्पणी चिंता वाढवणारी आणि विचार करावयास लावणारी आहे. देशातील माध्यमांपैकी काही गट प्रत्येक बातमीला धार्मिक किंवा जातीय रंग देतात, यामुळे देशाची बदनामी होते असे रामण्णा म्हणाले. हे काही अर्थाने खरेही आहे. त्याचे दृश्य या पंचवीस दिवसांत अधिकच ठळकपणे अधोरेखित झाले. शाहरूख खान, आर्यन खान आणि त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेले नवाब मलिक यांनी या प्रकरणाला जातीय आणि धार्मिक वळण कसे दिले हे प्रसारमाध्यमांनी ठळकपणे दाखवले. विशेषत: तपास अधिकारी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुसलमान आहेत की, हिंदू आहेत की, दलित आहेत हे बिंबवण्यात नवाब मलिक आणि ही माध्यमे धन्यता मानत होते. वानखेडे चूक की, बरोबर हा प्रश्नच नाही; पण त्यांनी केलेली चूक असेल, तर ती मुसलमान म्हणून केलेली नाही किंवा हिंदू म्हणून केलेली नाही. ती काही कोणत्याही धर्माची शिकवण नाही. मग हा अट्टाहास कशासाठी केला गेला? पण जे काही दिसले ते अत्यंत बिभत्स या प्रकारात होते.
आर्यन खान किंवा त्या क्रूझ पार्टीत सापडलेले लोक दोषी असतील अथवा नसतील. ते तपास यंत्रणा, कायदा पाहून घेईल; पण ते अमुक एका धर्माचे आहेत, हे बिंबवण्यामागचे कारण काय हे अनाकलनीय होते. दिवस-दिवस त्याशिवाय टीव्हीवर काहीही दिसत नव्हते. या काळात कोविडची राज्यातील परिस्थिती काय आहे, याचा विसर पडला होता. या काळात राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. शाळा, कॉलेज सुरू झाल्या होत्या. चित्रपट, नाट्यगृह सुरू झाली आहेत. त्याबाबत बातम्यांना फारसे महत्त्व न देता फक्त आर्यन खान आणि नवाब मलिक, क्रूझ पार्टी आणि वानखेडे याशिवाय कोणीही दिसत नव्हते. फक्त खळबळजनक दाखवायचे. समाजात तिरस्काराचे वातावरण तयार करायचे. हे प्रकार माध्यमांमधून होत असतील, तर ती चिंतेची बाब म्हणावी लागेल. सरन्यायाधीश रामण्णा यांनी हीच चिंता व्यक्त केली होती. समाज माध्यमे आणि डिजिटल व्यासपीठांमध्ये जबाबदारीची जाणीव नाही, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.

हे आताचे घडले आहे, असे नाही. ते सातत्याने घडले आहे. सरन्यायाधीशांनी व्यक्त केलेल्या चिंतेलाही एक पार्श्वभूमी आहे. गेल्या वर्षीच्या एका घटनेची त्यास पाश्‍र्वभूमी आहे. गेल्या वर्षी दिल्लीत तबलिघी जमात ही परिषद झाली. त्यास जगाच्या विविध भागांतून मुस्लीम धर्मीय आले होते. त्याच सुमारास कोरोनाचा प्रकोप सुरू झाला. ती साथीची पहिली लाट होती; मात्र तबलिघी जमात कार्यक्रमामुळे कोरोनाची साथ पसरली, असे वृत्त काही दूरचित्रवाहिन्यांनी दिले. समाज माध्यमांमध्ये, तर अशा स्वरूपाच्या बातम्यांचा पूर आला. तो समज पसरविण्यात व इस्लाम धर्मीयांना दोषी ठरवण्यात काही वाहिन्या आघाडीवर होत्या. अशा बातम्यांवर विसंबून दिल्ली पोलिसांनी तबलिघी जमात कार्यक्रम आयोजित करणाºयांवर, त्यात सहभागी होणाºयांवर विविध कायद्यांखाली व कलमांखाली गुन्हेही दाखल केले. हे प्रकार अत्यंत चुकीचे आहेत. बातम्यांमधून मूळ बातमी सोडून भलतेच काही, तरी दाखवणे हे अत्यंत घातक आहे.
त्यामुळे शनिवारी आर्यन खानला सोडल्यावर महाराष्ट्राने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता तरी काही तरी वेगळे पाहायला, ऐकायला मिळेल; पण कुठले काय? अजून काही अफवा, गॉसिपिंग करायला मिळते काय याच्याच मागे माध्यमे धावताना दिसत आहेत. शाहरूखच्या मुलाबरोबरच अजून डझनभर मुलांना पडकले आहे; पण ती वलयांकीत नाहीत, म्हणून त्यांच्या आई-वडिलांना दु:ख झाले का, याकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आपल्याकडील माध्यमे सामान्य, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पाहणार आहेत की नाही? या पंचवीस दिवसांत संपूर्ण राज्याचा कारभार ठप्प झाला होता आणि फक्त आर्यन खानच महत्त्वाचा होता. तो सुटला नसता, तर जगबुडी झाली असती. असे वातावरण तयार केले होते.

आता त्या आर्यन खानच्या मुलाखती सुरू होतील. या वाहिन्यांचे प्रतिनिधी दिवाळीत मन्नत बंगल्यावर जातील आणि त्याच्या मुलाखती घेण्यासाठी धडपडतील. आगामी काळात त्याच्या जीवनावर एखादी बायोग्राफी तयार होईल आणि संजूप्रमाणे चित्रपट येईल. अशा अनेक बातम्या पुढचे काही काळ पाहायला मिळतील; पण शाहरूख आणि आर्यन खान यांच्यापेक्षाही महाराष्ट्र मोठा आहे. इथे बरेच काही घडत असते. हे दाखवणे गरजेचे आहे. याचे भान माध्यमांनी जपले पाहिजे. खेलरत्न पुरस्कारांची घोषणा झाली; पण त्याला वाहिन्यांनी महत्त्व दिले नाही, कारण आर्यन त्यापेक्षा महान होता.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …