ठळक बातम्या

अग्रलेख : शरद पवारांचे सामर्थ्य

कोणत्याही भागात कधीही भूकंप झाला की, त्याचा केंद्रबिंदू कुठे आहे, किती रिश्टर स्केलचा तो भूकंप आहे हे पाहिले जाते. त्याचप्रमाणे कोणताही राजकीय भूकंप असेल, तर त्याचा केंद्रबिंदू हमखास शरद पवारच असणार असा कोणी संशय व्यक्त करतो, तर कोणी छाती ठोकपणे सांगतो. कोणी आतल्या आवाजात बोलतो, तर कोणी अभिमानाने सांगतो या घडामोडींमागे शरद पवारच आहेत, त्यांचाच हात आहे वगैरे वगैरे. आज हाच भूकंपाचा केंद्रबिंदू असलेले ज्येष्ठ नेते भारतीय राजकारणातील अविभाज्य भाग असलेले शरद पवार आता ८२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, पण आजही त्यांच्यातील निद्रिस्त ज्वालामुखी सळसळतो आहे. एका मोठ्या भूकंपासाठी हा लाव्हारस बाहेर येऊ पाहतो आहे. तो भूकंपाचा केंद्रबिंदू पाहण्यासाठी मागच्या आठवड्यात प. बंगालची वाघिण येऊन गेली. शरद पवारांशिवाय आपल्या आघाडीच्या प्रयत्नांना काडीचाही अर्थ नाही हे त्यांनी ओळखले हेच शरद पवारांचे सामर्थ्य दाखवून देते.

माणसे वयाने नाही, तर मनाने म्हातारी होतात. माणसाची कार्यक्षमता ही वयावर नाही, तर मनावर अवलंबून असते हे शरद पवारांकडे पाहून लक्षात येते. घटकेत मुंबई, घटकेत पुणे, बारामती, तर घटकेत दिल्लीत जाऊन आपल्या भूमिका चोख करण्याचे कसब त्यांच्यात आहेत. ही इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक भूकंप देशाच्या राजकारणात घडवून आणले आहेत. ज्या काँग्रेसच्या विदेशी नेतृत्वाला विरोध करत त्यातून बाहेर पडले आणि पाच वर्षांनंतर त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कृषी मंत्री झाले हे शरद पवारच करू शकतात.
आता यूपीएचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. ममतांची माया ही त्यासाठीच वापरली जात आहे. एकीकडे ममतांबरोबर जातो असे दाखवत दुसरीकडे संजय राऊत यांनी यूपीए टिकली पाहिजे, असे सांगून शरद पवारांना खुर्ची देण्याची करामत हा त्याचाच एक भाग आहे. कारण यूपीएचे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार. सोनिया गांधींना ते मिळाले नाही, मिळू दिले नाही, पण शरद पवारांना ते सहज मिळणार हे निश्चित. मग शरद पवार जर पंतप्रधान पदाचे उमेदवार, यूपीएचे अध्यक्ष म्हणून पुढे आले, तर काँग्रेस संपल्यातच जमा आहे. त्यामुळे आगामी काळात असाच एक भूकंप आघाडीसाठी ते करतील यात शंकाच नाही.

२००४ साली २०० जागा असल्यामुळे हे पद काँग्रेसकडे गेले होते. हे पद जर शरद पवारांच्या जागा आमच्यापेक्षा जास्ती आल्या तर त्यांनाही मिळेल, असे २००९ च्या निवडणुकीत राहुल गांधी म्हणाले होते. शरद पवारांचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही खासदार नव्हते. अशा परिस्थितीत आपले वाढणार नाहीत ना, मग त्यांचे कमी झाले तरी चालतील. ही रणनीती आखून काँग्रेस आज तीन अंकीवरून दोन अंकीवर आली. आता शरद पवारांना हा पल्ला गाठणे अवघड नाही. त्यामुळेच काँग्रेसमध्येच भूकंप घडवणारी किमया त्यांनी सुरू केली आहे.
गेल्या वर्षी राहुल गांधींमध्ये सातत्य नाही, असे मुलाखतीत उत्तर देऊन राहुल गांधींची निष्क्रियता पवारांनी अधोरेखित केली होती. आता यूपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेने सौम्य का होईना काँग्रेसला धक्का बसला आहे, पण शरद पवार हे चांगले राजकारणी, मुत्सद्दी, धोरणी असले तरी त्यांचा कामाचा झपाटा प्रचंड आहे. गेल्या वर्षी पक्षाच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्याला त्यांनी विरोध केला होता. याचे कारण राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, दुष्काळाचे संकट शेतकºयांवर घोंगावत असल्याने वाढदिवस साजरा करायचा नाही, अशी भूमिका पवार यांनी घेतली होती, मात्र हा वाढदिवस शेतकºयांना समर्पित करून बळीराजाला मदत करायची अशी भूमिका मांडल्यावर त्यांनी होकार दिला. म्हणून ते खºया अर्थाने शेतकºयांचे नेते आहेत. आजही शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नाही, तर त्यावर तोडगा निघण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

१९९९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात स्थित्यंतर घडले. सोनिया गांधींचे नेतृत्व अमान्य करून शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा पवार यांच्या मागे तरुणांची मोठी फळी उभी राहिली होती. त्यात त्यांनी छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांना मंत्रिमंडळात संधी दिली आणि प्रोत्साहन दिले होते. आज पवार हे ८२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वयातही त्यांची जिद्द, ऊर्जा थक्क करणारी आहे. त्यांचे मन तरुण आहे. म्हणूनच मरगळ आलेली परिस्थिती ते बदलू शकतात. म्हणूनच त्यांच्यातील ज्वालामुखी आता काय भूकंप करतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
आज भाजपकडे नेतृत्व आहे, तर काँग्रेस आणि यूपीएकडे सक्षम नेतृत्व नाही म्हणून भाजप सत्तेत आहे, पण शरद पवारांच्या रूपाने जर सक्षम नेतृत्व आहे हे दाखवले गेले, तर ते मोदी, शहा यांच्या भाजपला धक्का देऊ शकतात. आज शेतकºयांची ताकद आपल्या पाठीशी उभी करून ते याचा फायदा उठवू शकतात याची जाणीव भल्याभल्यांना आहे. म्हणूनच तर त्यांना भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. याच शरद पवारांनी १९९८ ला वाजपेयी सरकार १ मताने कोसळवले होते. त्यामुळे कोणताही भूकंप घडवून आणण्याची ताकद फक्त शरद पवारांकडे आहे हे नक्की. अशा या सामर्थ्यशाली नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …