अग्रलेख : युद्धाचे ढग

भारतीय उपखंडात युद्धाचे ढग तयार होत असल्याचे वृत्त चार दिवसांपूर्वी होते. अर्थात हे ढग जमा होण्यास कारणीभूत सर्वस्वी चीन आहे. महासत्ता आणि सरंजामी प्रवृत्ती वाढत चालल्याने या राक्षसी महत्त्वाकांक्षेत छोट्या माशाला मोठ्या माशांनी गिळायचे प्रयत्न चालू आहेत. त्याप्रमाणे भारतीय उपखंडात हैदोस घालायला आता तीन प्रमुख महासत्तांचे उपखंड येताना दिसत आहेत. अमेरिका, युरोप आणि आॅस्ट्रेलिया चीनविरोधात दंड थोपटणार याचा अर्थ संपूर्णपणे सुक्या बरोबर ओले जळण्याची जी परिस्थिती असते तसे पडसाद चीनमुळे भारताबाबत होण्याची भीती आहे. असे युद्ध झालेच, तर तीनही खंडांचे काही नुकसान होणार नाही; पण भारतीय उपखंडात त्याचे परिणाम जाणवतील.

चीनमध्ये लाल ड्रॅगनला शक्ती, सामर्थ्य याचे प्रतीक मानले जात असले, तरी पाश्चिमात्य देशांमध्ये ड्रॅगनला सैतानाचे रूप मानले जाते आणि हेच रूप खरे असावे. अशा या सैतानाची नजर केवळ अफगाणिस्तानवर नाही तर भूतान, तैवान व ईशान्य भारतावरही आहे, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे चीनमुळे हे एकप्रकारे महायुद्धच होण्याची भीती आहे. भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी या सर्व महासत्ता आपली ताकद खर्ची करणार हे यातून दिसत आहे. एकेकाळी भारतीय आणि चीन यांची लोकसंख्या हा हास्यास्पद विषय होता; पण आता तीच चीन आणि भारताची ताकद बनताना दिसत असल्याने हे युरोप, अमेरिका, आॅस्ट्रेलिया या ताकदीवरच प्रहार करण्यासाठी सरसावले आहेत. याला सर्वस्वी चीन कारणीभूत असणार आहे. दोन वर्षांपूर्वी कोविडच्या संकटात संपूर्ण जगाला चीनने ओढले. त्या जैविक युद्धाचा राग सर्वांना आहेच. तोही इथे कुठे तरी निघेल. यादरम्यान अनेक जैविक हल्ले होण्याची भीती आहे. चीनने कोणालाही न जुमानता वाढवलेली अण्वस्त्रे नेमकी कोणासाठी आहेत, हाही प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला आता अगदी डोळ्यात पाणी घालून रहावे लागणार आहे, हे नक्की.
नवी दिल्लीत अफगाणिस्तानमधील स्थितीवर विचार करण्यासाठी काही निवडक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची एक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. प्रथम पाकिस्तानने या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आणि नंतर चीनने बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय कळविला. पाकिस्तान आणि चीन यांची युती दिवसेंदिवस बळकट होत आहे. त्यामागचे कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. दोन्ही भारताचे शत्रू असल्याने एक होत आहेत; पण पाकिस्तानची यामध्ये अवस्था इसापनीतीतील त्या बेडकाप्रमाणे होईल ज्याने आपल्या भाऊबंदांना संपवण्यासाठी सापाला डबक्यात बोलावले. सर्व बेडूक संपल्यावर त्या सापाचा घास होत तो बेडूक संपला. पाकिस्तान चीनला थारा देऊन भारताविरोधात करत असलेल्या कारवाया हा त्याचाच एक भाग आहे.

वास्तविक भारताने चीन, पाकिस्तानसह मध्य आशियातील अन्य ७ देशांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते. त्यातील तुर्कमेनिस्तान, कजाकिस्तान, उझबेगिस्तान, रशिया, इराण या देशांनी बैठकीस हजेरी लावली. भारतासाठी एक चांगली बाब म्हणजे रशियाने या बैठकीत भाग घेण्यासाठी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारास पाठविले. ही या बैठकीची जमेची बाजू मानली जाईल. मात्र, जे दोन देश अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीसाठी थेट जबाबदार आहेत, त्या दोन देशांनी चीन व पाकिस्तान यांनी बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने, या बैठकीचा उद्देश मर्यादित प्रमाणात साध्य झाला. साहजिकच या दोन देशांना जगावर युद्ध लादायची इच्छा आहे, असे दिसते. चीन व पाकिस्तान यांनीही बैठकीस हजेरी लावली असती, तर अफगाणिस्तानमधील स्थितीवर चर्चा करता आली असती, पण ते होऊ नये या हेतूनेच चीनने बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला; मात्र यामुळे भारताला अधिक आव्हानात्मक स्थितीला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत हे जमा होत असलेले ढग म्हणजे चिंतेची बाब आहे.
अफगाणिस्तानची सीमा पाकव्याप्त काश्मीरला लागून आहे, म्हणजे भारताचा विचार केल्यास भारताला लागून आहे. अशा या सीमेलगत देशावर म्हणजे अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवून चीन थांबलेला नाही. त्याने भारताची सीमा असलेल्या आणखी एका देशावर भूतानवर आपली नजर स्थिरावली आहे. २०१७मध्ये भारत-चीन यांच्यातील डोकलाम गतिरोध गाजला होता. डोकलाम असलेल्या डोकला भागावर १९६६ पासून चीनची नजर आहे. २०१७ पर्यंत चीन या भागात कच्चे रस्ते बांधत होता. आता त्याने पक्के रस्ते बांधणे सुरू केले आहे. भूतानसोबतच्या वादग्रस्त भागात त्याने ६०० गावं वसविली असून, या गावांमध्ये पक्की घरे बांधण्यात आली आहेत. चीन-भूतान यांनी मागील महिन्यात एक करार केला. दोन्ही देशांतील सीमावाद परस्परांशी चर्चा करून सोडविला जाईल, हे सांगण्यासाठी हा करार करण्यात आला. त्यानंतर चीनच्या नजरा तैवानकडे वळल्या. त्याबरोबर सगळे महासत्तेच्या जवळ असलेले खंड आक्रमक झाले. अमेरिका, युरोपीयन समूह आणि आॅस्ट्रेलियाने याकडे लक्ष केंद्रीत करत युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. अर्थात त्या संकटाच्या छायेत आज भारत आहे.

चीन-भूतान यांच्यात जो सीमावाद आहे, तो केवळ कागदावर नाही तर चीनने भूतानचा काही भाग अगोदरच गिळंकृत केला आहे. त्याला आता अधिकृत ठरविण्यासाठी ही चर्चा केली जात आहे. म्हणजे चीनने भूतानचा जो भाग गिळंकृत केला आहे, त्याला अधिकृत ठरविण्याची पद्धत-प्रक्रिया निश्चित करण्यासाठी भूतानसोबत ही चर्चा केली जात आहे आणि ज्या भूतानजवळ स्वत:चे सैन्य नाही, जो आपल्या संरक्षणासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून होता, त्या भूतानसमोर चीनच्या दादागिरीला शरण जाण्याखेरीज पर्याय नव्हता. चीनने भूतानच्या तीन भू-प्रदेशांवर दावा सांगितला आहे. यातील उत्तर व पश्चिम भूतानचा भाग तसा लहान आहे. यातील डोकलामचा भाग भारतासाठी फार महत्त्वाचा होता. डोकलामवर भूतानचा ताबा राहणे भारतासाठी आवश्यक होते, कारण डोकलाम पठारावर भारताला चीनविरोधात लष्करी कारवाईचा एक मोठा लाभ होत होता. त्यामुळे भारताला नमवण्यासाठी भूतानचा वापर करण्याचे हे तंत्र चीनने शोधले आहे. त्यावर मात करणे हे आपल्यासाठी आवश्यक आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …