ठळक बातम्या

अग्रलेख : प्रकरण चिघळवले


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची १३ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मार्च महिन्यातील दोन दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फुटलेला फटाका अखेर दिवाळीपूर्वीच फुटला. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात होताना दिसत आहे. हे प्रकरण विनाकारण चिघळवले गेले असे वाटते. या प्रकरणातील एक अधिकारी परमबीर सिंग हे बेपत्ता आहेत. त्यांचा पगार थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत परमबीर सिंग सापडत नाहीत, तोपर्यंत आपल्याला कोणी हात लावू शकणार नाही, अशा भ्रमात अनिल देशमुख राहिले आणि गेले सहा महिने टाळाटाळ करत राहिले, न्यायालयात गेले, सगळीकडून नकार मिळाल्यावरही ते अज्ञातवासात राहिले. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे आपण दोषी असल्याचे दाखवले. ईडीचा अन्याय होतो आहे, गैरवापर होतो आहे, असा आकांडतांडव करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाला, पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. अनिल देशमुख यांना अटकेला सामोरे जावे लागले. हेच जर ते वेळीच चौकशीला गेले असते, तर ही वेळ आलीही नसती. ईडीच्या चौकशीला सामोरे जाणे ते का टाळत होते, हा खरा प्रश्न आहे. सुरुवातीला वयाचे, मग तब्येतीच कारण सांगितले. कोरोनाची लाट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळे बहाणे करून झाल्यावर त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले आणि ऐन दिवाळीत अटक झाली.

अनिल देशमुख यांच्याविरोधात सगळे पुरावे गेलेले होते. याचे कारण याप्रकरणी अनिल देशमुख याचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. जुलैमध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडी कोठडी मागताना ईडीने १४ दावे केले होते. त्यामध्ये या दोघांनी अनिल देशमुख या कटाचे प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट केले होते. पालांडे यांनी जबाबात सांगितले आहे की, पोलीस अधिकाºयांच्या बदली मागे अनिल देशमुख यांचा हात होता. त्याशिवाय सगळा व्यवहार रोखीने व्हायचा. यामध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मध्यस्थ आहेत. पैसे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जात होते. ही सगळी कबुली या दोघांनी दिल्यानंतर अनिल देशमुखांची अटक निश्चितच होती.
याशिवाय सचिन वाझे यांच्या जबाबानुसार, त्यांना अनिल देसमुख यांच्याकडून काही प्रकरणात थेट आदेश मिळत होते. वाझे जबाबात सांगतात त्यांनी अनिल देशमुख यांच्या आदेशावरून ४.७० कोटी रुपये कुंदन शिंदे यांना दिले. अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत ४.१८ कोटी रुपये ट्रान्सफर झालेत. पैसे देणाºया दिल्लीच्या कंपन्या फक्त पेपरवर आहेत. हवालाच्या माध्यमातून पैसे दिल्लीहून नागपूरला आणण्यात आले. अनिल देशमुख यांना बार मालकांकडून ४.७० कोटी रुपये लाच म्हणून मिळाले. इतके सगळे कबुली जबाब झाल्यावर अनिल देशमुख यांनी अगोदरच चौकशीला सामोरे जाणे आवश्यक होते, पण ते गेले नाहीत, त्यामुळे ते दोषी आहेत याबाबत संशय वाढत गेला. हा वाढता संशय त्यांना घातक ठरला.

देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग फरारी आहेत. आरोप करणारा फरारी आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते चौकशीला सहकार्य करत आहेत, त्यांना अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली असून, सरकारला बदनाम करण्यासाठी नेत्यांना धमकावण्यासाठी आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत असला, तरी त्यात थोडेफार तथ्यही असावे. पण परमबीर सिंग यांना कुठे ठेवले आहे का?, ते खरोखरच पळून गेले आहेत का?, त्यांना कोणी लपवून ठेवले आहे का?, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. त्यामुळे आता परमबीर सिंग यांना पकडणे खरे महत्त्वाचे आहे. एवढा मोठा अधिकारी बेपत्ता कसा काय होऊ शकतो?, त्यांच्या पळून जाण्याचे निमित्त करून अनिल देशमुख चौकशीला हजर झाले. आरोप करणारे परमबीर सिंग सापडत नाहीत, त्यामुळे आपल्याला कोणी अटक करणार नाही या भ्रमात ते राहिले,पण त्यापूर्वीच वाझे आणि देशमुखांच्या दोन्ही पीएनी दिलेले जबाब ते विसरले.
पण सध्या जे आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण चालत आहे. त्यात गेले पंधरा-वीस दिवस नवाब मलिक आरोप करत होते. सोमवारी त्यांनी फडणवीस आणि त्यांच्या पत्नीला अडकवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे अनिल देशमुखांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांना मुठभर मांस चढलेले दिसते. किरीट सोमय्या यांनी तर पुढचे काही अंदाज बांधायला सुरुवात केलेली आहे. या गलिच्छ राजकारणाला सामान्य जनता मात्र कंटाळलेली आहे. अशी प्रकरणे तातडीने सोक्षमोक्ष लावण्याची गरज असताना ती प्रतिष्ठेची करून चिघळवली गेली हे वाईट आहे. कधी ड्रग्ज प्रकरण, तर कधी ईडी प्रकरण याशिवाय राज्यात काही आहे असे कोणाला वाटत नाही. आॅक्टोबरचा संपूर्ण महिना आर्यन खानने गाजवला. त्यानंतर समीर वानखेडे यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रकरणात नवाब मलिकांनी भाजपला गोवायचा प्रयत्न सुरू केला. अर्थात यात त्यांचा लढा हा एकाकी होता, पण ते थांबले आहे तर आता अनिल देशमुखांचे प्रकरण आले. हे सगळे हास्यास्पद आणि केविलवाणे राजकारण आहे. भला मेरी कमीज उसकी कमीजसे जादा सफेद कैसी असे म्हणण्याचा आणि एकमेकांचा मळ दाखवण्याचा हा प्रकार आहे. नवाब मलिक पिक्चर अभी बाकी हैं म्हणत एनसीबी आणि भाजपचा संबंध जोडत असताना ही कारवाई होणे गंभीर आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …