नाशिक येथे आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या भाषणात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नमूद केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी जरी भाषणाची चित्रफीत पाठवली असली, तरी त्यातील मुद्दे अत्यंत महत्त्वाचे होते. ज्यावर भाष्य करण्याचे धाडस आजवर कोणी केले नव्हते. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल, पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल, तर ती ऐतिहासिक कादंबरी कशी ठरेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हा फार महत्त्वाचा विषय आहे.
गेली काही वर्ष इतिहासाची तोडमोड करणे, नको त्या व्यक्तींचे उदात्तीकरण करणे आणि चुकीचा इतिहास मांडण्याची प्रवृत्ती डोके वर काढताना दिसते आहे. आपल्या मनातील कपोल कल्पीत कल्पनांना इतिहासाशी जोडून तेच सत्य आहे, असे भासवण्याचा प्रकार होतो. या चुकीच्या गोष्टींवर कोणीतरी भाष्य करणे गरजेचे होते. कुसुमाग्रजांच्या नगरीत हा मुद्दा मांडला हे फार महत्त्वाचे आहे. याचे कारण एकाच व्यक्तिरेखेचे अकारण उदात्तीकरण होत असताना त्याचे वास्तव मांडण्याचे काम शिरवाडकरांनी केले होते, म्हणून या मताचा विचार होणे गरजेचे आहे.
नारळीकरांनी फक्त इतिहासावरच नाही, तर विज्ञान कथांवरही प्रहार केला आहे. ते म्हणाले की, एखादी विज्ञान कथा आणि कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळे किंवा वाईट लेखनशैली, अपूर्ण स्वभावचित्र इत्यादीमुळे निकृष्ट ठरेल. त्याउलट, विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणांमुळे वाचनीय वाटेल. अशा स्थितीतही विज्ञान कथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन. ऐतिहासिक कादंबºयांच्या बाबतीतही मी असेच परीक्षण करेन. म्हणून जरी साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल, पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल, तर ती ऐतिहासिक कादंबरी कशी ठरेल?, असा प्रश्न विचारत डॉ. नारळीकर यांनी अशा कादंबरीला कमीच लेखले पाहिजे, असे स्पष्ट केले आणि विज्ञान साहित्याप्रमाणेच ऐतिहासिक साहित्याच्या मूल्यमापनाची गरज व्यक्त केली. हा आजवरच्या साहित्य संमेलनातला सर्वात चांगला मुद्दा म्हणावा लागेल.
याचे कारण गेली पाच दशके शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आणि नाटक तुफान गाजते आहे. महाभारतातील सर्वात चांगले व्यक्तिमत्त्व कोणते असे कोणाही तरुणाला किंवा फारसा अभ्यास नसलेल्या व्यक्तीला विचारले, तर तो कर्ण असे सांगतो. यासारखे दुर्दैव ते काय म्हणायचे?, कर्णाचे उदात्तीकरण करून शिवाजी सावंत यांनी इतिहासात, पुराणात चुकीचा समज पसरवून दिला होता. खरंतर कर्ण हा दुर्योधनापेक्षा दुष्ट होता. कर्णामुळेच द्रौपदीचे वस्त्रहरण होते, पण त्याच्या दानशूरपणाचे उदात्तीकरण केले गेले. त्याचा चांगुलपणा खुलवला गेला आणि त्याची काळी बाजू झाकली गेली, ही इतिहासाची प्रतारणा होती. एखादी दुष्ट व्यक्ती चांगली म्हणून लादण्याचा प्रयत्न झाला, म्हणून ती खूप गाजली तरी तिने इतिहासाशी केलेली प्रतारणा आहे, हे अंजन नारळीकरांनी घातले. आज त्याचाच पायंडा पडत अनेकजण चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडतात. चांगल्या व्यक्तींना बदनाम करतात, मात्र नाशिकच्या वि. वा. शिरवाडकरांनी मात्र आपल्या कौंतेय या नाटकातून कर्ण नेमका कसा होता याची अचूक माहिती दिली होती. कर्णाचा दुष्टपणा, त्याची आपल्या आई अगदी कुंतीकडेही माणसाची मादी म्हणून पाहण्याची प्रवृत्ती त्यांनी अचूक मांडली होती, पण मृत्युंजयच्या उदात्तीकरणापुढे ती तोकडी पडली. त्यावर कोणी बोलायचे आजवर धाडस केले नाही. नारळीकरांनी कोणत्याही लेखकाचे नाव घेतले नाही, कोणत्याही कादंबरीचा उल्लेख केला नाही, पण गेल्या पन्नास वर्षांत अनेक कादंबºया ऐतिहासिक कादंबºयांमधून चुकीचा इतिहास पसरवला गेला हे मात्र नक्की. म्हणूनच इतिहासाचेही संशोधन केले पाहिजे हे संशोधक, विज्ञानवादी जयंत नारळीकरांनी मांडलेले मत हे फार महत्त्वाचे आहे.
अगदी अलीकडच्या काळाचाच विचार करायचा झाला, तर मी नथुराम गोडसे बोलतोय अशा नाटकातून जर नथुरामाचे समर्थन होत असेल, तर तेही चुकीचे आहे. ज्याप्रमाणे नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणे ही इतिहासाची प्रतारणा आहे, तसेच कर्णाचे उदात्तीकरण करणे हे पण चुकीचे आहे. अशा नाटकांमुळे गेल्या काही वर्षांत नथुरामाचे पुतळे उभारण्याची भाषा होऊ लागली. प्रसिद्धीकरिता चुकीचा मार्ग अवलंबला गेला तर काय होते हे त्यातून दिसते. हाच प्रकार गेल्या दोन दशकातला पण आहे. त्यामध्ये १३ डिसेंबरला झालेल्या संसदेवरील हल्ला. या हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरू होता. तो पाकिस्तानी होता, की काश्मिरी होता, की भारतीय होता हे महत्त्वाचे नाही. पण त्याने लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला केला. त्याला फाशी दिली गेली. तर त्याला हुतात्मा ठरवण्याचे काम केले जाते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्याचा स्मृतिदिन साजरा केला जातो. त्याच्याविरोधात आवाज उठवला तर देशात दंगे होतात. अफझल गुरूचे समर्थन करणारे नेते काँग्रेसचे उमेदवार, नेते, स्टार प्रचारक होतात. हे काय चालले आहे?, या सगळ्याच इतिहास वर्तमान आणि भविष्यासाठी घातक असणाºया गोष्टी आहेत. म्हणूनच चुकीचे मतप्रवाह पसरवणारे साहित्य हे वाईट आहे, त्यावर डॉ. जयंत नारळीकरांनी भाष्य केले हे महत्त्वाचे आहे.
One comment
Pingback: 토렌트 다운