(अग्रलेख) घरचा वाद चव्हाट्यावर का?

घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच. सासवा-सुनांची भांडणं असतात. नवरा-बायकोची भांडणं असतात. भावा-भावाची भांडणं असतात; पण याचा अर्थ ही भांडणं चव्हाट्यावर घेऊन जायची नसतात. चव्हाट्यावर नेली की, त्याचा तमाशा होतो. तसाच काही प्रकार सध्या होताना दिसून येत आहे. तो म्हणजे राज्यातील सरकार आणि विरोधक यांच्यातील संबंध हे सत्ताधारी आणि विरोधक असे न राहता भारत-पाक, असे होताना दिसत आहेत. लोकशाहीच्या विरोधी ही भूमिका आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी मिळून राज्य चालवायचे असते; पण आज परिस्थिती अशी आहे की, विरोधक आणि सत्ताधारी प्रत्येक गोष्ट चव्हाट्यावर आणू पाहत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे दादरा-नगर-हवेलीतील पोटनिवडणुकीची सभा.

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा-नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजप उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र सरकारवर त्यांनी प्रचंड टीका केली. दादरा-नगर-हवेलीत तिथल्या प्रश्नांबाबत बोलायचे सोडून महाराष्ट्रातील सरकार किती वाईट आहे, हे काय सांगत बसलात? हा प्रकार चव्हाट्यावर भांडणे आणण्याचा प्रकार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तसे करायला नको होते. नवरा कितीही वाईट असला, बायको कितीही भांडखोर असली, तरी त्यांची गाºहाणी त्रयस्तांपुढे गायची नसतात. चुकत असतील सत्ताधारी पक्ष; पण याचा अर्थ त्यांची चुकीची कामे बाहेर जाऊन बोलायची गरज नाही. ती सभागृहात बोला, माध्यमांसमोर बोला, राज्यात कुठेही बोला. पण राज्याबाहेर केंद्रशासित प्रदेशात बोलून काय उपयोग आहे?
खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर दादरा-नगर-हवेलीमध्ये पोटनिवडणूक प्रलंबित होती. ही निवडणूक आता होत असून, त्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. कलाबेन डेलकर यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. येत्या ३० आॅक्टोबर रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. या प्रचारसभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर हल्ला चढवला. फडणवीस यावेळी म्हणाले की, ते मोदींचे नाव घेऊन निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. हे लोक फक्त संधीसाधू आहेत. जेव्हा त्यांना निवडणुका लढायच्या असतात, तेव्हा मोदींची आठवण येते आणि निवडणुका झाल्यावर त्यांना सत्ता दिसू लागते. शिवसेना दादरा-नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचे राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला. ते येथे आले, तर नाव महाराष्ट्राचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, असा घणाघात फडणवीस यांनी केला. हे फडणवीस यांचे चुकल्यासारखे वाटते. त्यांनी महाराष्ट्रातील सेना, राष्ट्रवादीचे नेते चुकले, तरी त्यांच्याबाबत बाहेर जाऊन बोलणे चुकीचे आहे. हा प्रकार म्हणजे घरची भांडणे चव्हाट्यावर आणण्याचा प्रकार आहे. त्यांच्या चुका तुम्ही महाराष्ट्रात कितीही उगाळा पण दादरा-नगर-हवेलीत जाऊन हे बोलायची काहीच गरज नव्हती. तिथल्या लोकांना शिवसेना चांगली आहे की, खंडणीखोर आहे याच्याशी काय संबंध आहे? तुम्ही काय करणार आहात हे सांगायला नको का? ते संधीसाधू आहेत, हे सांगण्याची गरज नाही. आपली संधी आपण का गमावत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. घरातली माणसं कितीही वाईट असली, तरी त्यांच्याबद्दल जाहीरपणे कोणीही वाईट बोलत नाही. एकवेळ त्यांचा उल्लेख टाळा; पण त्यांचे दुर्गुण बाहेर कशाला सांगायचे? अंतर्गत बाबी बाहेर नसतात न्यायच्या. आज काँग्रेस जे करत आहे, तेच भाजपचे नेते करणार का? काँग्रेसचे दिग्विजय सिंह पाकिस्तानात जाऊन मोदींवर, अमित शहांवर टीका करतात आणि काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा ३७० कलम लागू केले जाईल, असे बोलतात. भारतातील, काश्मीरचे काही प्रश्न असतील, तर ते पाकिस्तान सोडवणार नाही. याचे भान काँग्रेस नेत्यांना नसते. तोच प्रकार जर फडणवीस यांच्यासारखे नेते करत असतील, तर ते चुकीचे आहे. शिवसेना, राष्ट्रवादीशी राज्यात येऊन बोला. त्यांच्याशी चर्चा करा. त्यांना काम करायला लावा. त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून द्या; पण त्या चुका दादरा-नगर-हवेलीत बोलून काय उपयोग आहे? हा महाराष्ट्राचा अपमानच आहे.

विचारांवर चालणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. त्यांनी अविचारी पक्षांची री ओढण्यात वेळ घालवता कामा नये. आपण चांगले काम करत रहावे, हा दृष्टीकोन ठेवून काम करा, जनतेने डोळे मिटलेले नाहीत. याबाबत नितीन गडकरींचा आदर्श घेण्यासारखा आहे. समाजमाध्यमे, माध्यमे आज सर्व जण पाहत असतात. त्यांना भाषण करून प्रभावित करण्याची आता काही गरज नाही. महाराष्ट्रातील विषय महाराष्ट्रावर सोडा, दादर-नग-हवेलीचे मतदार येऊन इथे काही बदल घडवू शकणार नाहीत. त्यामुळे कुठे काय बोलायचे याचे भान ठेवले पाहिजे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …