ठळक बातम्या

अग्रलेख – गाफील राहून चालणार नाही

गेल्या पंधरा दिवसांत सगळं काही पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याने रस्ते, सार्वजनिक ठिकाणे ही गर्दीने तुडूंब भरलेली दिसत होती. देशातून कोरोना संपूर्णपणे हद्दपार झालेला आहे, अशा थाटात अनेक जण विनामास्क हिंडत होते. गर्दी करताना दिसत होते. कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते, त्यामुळे अशा लोकांना सांगावे लागेल की, गाफील राहून चालणार नाही. छोटीशीही चूक आणि गाफीलपणा पुन्हा देशाला, सर्वसामान्यांना संकटात खेचू शकतो.

खरं म्हणजे संपूर्ण देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप ओसरलेला नाही. काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात १० हजार ८५३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत; मात्र मृतांचा आकडा मोठा आहे. शनिवारी एकाच दिवसात ५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशातील संख्या ४ लाख ६० हजार ७९१ इतकी झाली आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ६६१ रुग्णांची नोंद झाली आहे, तर केवळ १० जणांचा मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी ही गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी आकडेवारी आहे. हे सगळं जरी खरं असलं, तरी अजूनही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. मागच्याच आठवड्यात पंतप्रधानांनी घराघरात जाऊन आता लसीकरण मोहिम राबवण्याचा आग्रह धरला होता. १०७ कोटी लोकांना एक डोस दिलेला असला, तरी अजून लहान मुलांचं लसीकरण झालेले नाही. त्यामुळे आपण कोरोनामुक्त आहोत, असे समजून नियम न पाळता गर्दी करणे हे धोक्याचे आहे. म्हणूनच गाफील राहता कामा नये.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात १२ हजार ४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार ८४५ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ३७ लाख ४९ हजार ९०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात वेगानं लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. २४ तासांत देशभरात २८ लाख ४० हजार १७४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशात १०८ कोटी २१ लाख ६६ हजार ३६५ जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या आणि दुसºया डोसची संख्या आहे. हे जरी खरे असले, तरी ज्याप्रकारे दिवाळीचा आनंद घेण्यासाठी लोक बाजारात विनामास्क हिंडत होते, सार्वजनिक ठिकाणी फिरत होते, ते पाहता हा गाफीलपणा महागात पडू शकतो, असे वातावरण होते.

गेल्यावर्षी याच गाफीलपणातून दुसरी लाट आलेली होती. आता लोकलसेवा सुरळीत झालेली आहे. लोकलला अधिकृतपणे आता गर्दी होताना दिसत आहे. अशात जर एखादा गाफीलपणे पॉझिटिव्ह असलेला रुग्ण असेल, तर तो याचा प्रसार करू शकतो. त्यामुळेच लसीकरणाबाबत घाई केली पाहिजे आणि सर्व सुरळीत असले, तरी अजून काही वर्ष आपल्याला खबरदारीने वागावे लागेल. मास्कमुक्त भारताची घोषणा होईपर्यंत विनामास्क फिरणे हे धोक्याचे ठरू शकते. यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. येत्या काही दिवसांत राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. त्याशिवाय देशात ५ महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका होतील. या काळात गर्दी वाढणार. बाहेरचे लोकांचे दौरे होणार. या परिस्थितीत सावधपणे मनाचे निर्बंध घालून वागणे हे अत्यावश्यक आहे. सरकारने दीड वर्ष निर्बंध घातले. आता आपण मनाचे बंधन पाळले, तर हा धोका आपल्याला होणार नाही.
दिवाळीच्या सणानिमित्त अनेकांनी पर्यटनस्थळांना, देवस्थानांना भेटी दिल्या. या काळात अनेक व्यक्ती बिनधास्तपणे मास्क न वापरता हिंडताना दिसत होत्या. हा प्रकार म्हणजे विषाची परीक्षा घेण्याचा प्रकार होता. दोनही डोस घेतले, म्हणजे आपण कोरोनामुक्त झालो असे नाही. दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोना झालेला आहे. त्यामुळे खबरदारी घेणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टी सरकारने कडक निर्बंध लादल्यावरच आपण पाळणार असू तर ते योग्य नाही. आता सरकारने आपल्यावर जबाबदारी सोपवली आहे. सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत असे नाही. यासाठी आपण मनाचे निर्बंध घालून मोकळेपणाने हिंडण्याची तयारी ठेवली पाहिजे.

आता चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू झालेली आहेत. पुढील आठवड्यात लग्नाचा हंगाम सुरू होईल. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होते; पण जरी निर्बंध शिथिल झालेले असले, तरी लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमातही कोणताही गाफीलपणा असता कामा नये. कोरोनामुळे आपल्याला कमी माणसात समारंभ करायची सवय लावली आहे, ती कायमस्वरूपी लावण्याची गरज आहे. यामुळे खर्चालाही आळा बसेल आणि रोगप्रसारालाही आळा बसेल. त्यामुळे गाफीलपणा सोडून, सरकारने निर्बंध उठवले, म्हणून आनंदात गर्दी करण्याचे प्रकार झाले, तर पुन्हा आपण संकटात सापडू शकतो. कोण कधी केव्हा कसा इन्फेक्टेड होईल, बाधित होईल हे काही सांगता येत नाही. म्हणूनच ही खबरदारी घेण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …