अग्रलेख ¸: भाजपच्या पथ्यावर

जोपर्यंत राहुल गांधी राजकारणात सक्रिय आहेत, तोपर्यंत भाजपला चिंता करण्याची गरज नाही. भाजपपेक्षा भाजप विरोधकच काँग्रेसचे खच्चीकरण करून भाजपचा रस्ता मोकळा करतील, असे दिसते. दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या, तेव्हा त्यांनी यूपीए आहे कुठे, असा सवाल करत काँग्रेस संपल्याचे जाहीर केले. दोन दगडांवर पाय ठेवणाºया शरद पवारांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण भाजप विरोधी सर्व पक्षांनी काँग्रेसचे अस्तित्व नाकारले, पण तरीही काहीही करता न आलेला काँग्रेस पक्ष हतबलपणे गप्प बसून राहिला. आपण कितीही काँग्रेसचा अपमान केला, घालून पाडून बोलले, तरी काँग्रेस काही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही. कारण काँग्रेसला महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत येऊन काही मंत्रिपदे मिळाली असताना आणि एक सरकार आपल्या हातात आहे याचा आनंद घेण्यासाठी कितीही अपमान केला, तरी काँग्रेस बाहेर पडणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला कसलाही धोका नाही हे शरद पवार जाणतात. त्यामुळे ममतांच्या चपलेले??????? काँग्रेसवर प्रहार करायला त्यांनी ही संधी साधली, तरी मनातून चरफडण्याशिवाय काँग्रेस नेते काही करू शकले नाहीत, पण या ज्या काही गोष्टी काँग्रेस नेते किंवा भाजप विरोधकांकडून होत आहेत, त्या भाजपच्या पथ्यावर पडत आहेत.

एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण यांना तर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी स्वत:चे शब्दही सुचले नाहीत. त्यांनी विलासराव देशमुख यांचे दहा वर्षांपूर्वीचे भाषण व्हायरल करून त्यांच्या तोंडून तेव्हाच्या काँग्रेसची महती गायली. कारण आजच्या काँग्रेसकडे महती गायला आहेच काय?, त्यामुळे अपमान गिळून काँग्रेसवाले गप्प बसले, कारण हातात असलेली मंत्रिपदे, एक तृतियांश सत्ता म्हणजे बुडत्याला काडीचा आधार आहे हे त्यांनी ओळखले आहे. त्यामुळे मित्र पक्षांनी लाथा घातल्या, तरी त्या दुभत्या गाईच्या लाथा गोड या न्यायाने ते सहन करतील. आज काँग्रेस सगळीकडे इतकी कमी झालली आहे की, तिला तोंड वर काढणे अवघड आहे हे ज्येष्ठ नेत्यांनी ओळखले आहे. गुरुवारीच ज्येष्ठ नेते गुलाम नवी आझाद यांनी काँग्रेसला २०२४ ला यश मिळवणे अवघड आहे, अशी कबुली देऊन युद्धापूर्वीच पराभव मान्य केला आहे. याचे कारण सततच्या झालेल्या चुका.
निस्सीम देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चिखलफेक करून, शिंतोडे उडवून ते स्वत:चीच प्रतिमा मलिन करताहेत. राज्यसभेतल्या गोंधळावरून काँग्रेसच्या सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर माफी मागण्यास सांगितले असता, कारण नसताना सावरकरांना मध्ये आणत त्यांनी स्वत:ची आणि पक्षाचीही लायकी दाखवून दिली आहे. काहीबाही बोलून ते स्वत:चे हसे करतातच; काँग्रेस पक्षाचेही नुकसान करतात. जेव्हा लस उपलब्ध नव्हती, तेव्हा ते लसीकरण वेगाने करण्याची मागणी करीत होते. आता लसीकरणाने जागतिक विक्रम केला असताना लसीकरण अपयशी ठरल्याचा आरोप ते करताहेत. लसीकरणाचे अपयश एका व्यक्तीच्या छायाचित्रामागे दीर्घकाळ लपवून ठेवता येणार नाही, असे वाह्यात वक्तव्य करून ते स्वत:चे हसे करून घेतात, पण यातून ते भाजपचा प्रचार करत आहेत. आपला निकम्मेपणा दाखवत भाजपला मोठे करत आहेत. त्यामुळे काँग्रेस असो वा भाजप विरोधी अन्य पक्ष त्यांना आजतरी भाजपला रोखणे सोपे नाही. ममता बॅनर्जी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, तुम्ही करत असलेल्या आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांना देणार का?, यावर त्यांनी उत्तर दिले नाही आणि शरद पवारही चाचपडले, पण यातून या आघाडीत नेतृत्वाबाबतच एकमत नाही, त्यामुळे तो पर्याय होणार नाही, यूपीए शिल्लक नाही असे त्यांनी जाहीर करून फक्त भाजपच शिल्लक आहे हे जाहीर केले. अगदी संजय राऊत यांनी शिवसेना आणि अकाली दल गेल्यामुळे एनडीए पण शिल्लक नाही असे म्हटले असले, तरी भाजप फक्त शिल्लक आहे, असे सांगून फक्त भाजपच आहे असेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधक भाजपचे हिताचे आहेत असे दिसते.

संकट समयी आपल्या देशातील राज्यकर्त्याचा अभिमान बाळगायचा असतो, त्यांना मदत, सहकार्य करायचे असते, पण याचे भान काँग्रेसला नसल्याने काँग्रेस जनतेच्या मनातून उतरत आहे. कोरोना संकटाच्या काळात मोदींनी केलेल्या कामाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले, पण काँग्रेसने अवहेलना केली. ती पण कोणी तर राहुल गांधी यांनी. कसे जनता जवळ करणार त्यांना?, देशात एकाच दिवशी दोन कोटी लोकांचे लसीकरण झाले होते, तेव्हा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारचे अभिनंदन करण्याचा मोठेपणा दाखविण्याऐवजी त्यांनी त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ही बाब जनतेला अजिबात आवडली नव्हती, पण जनतेला काय आवडते आणि काय नाही, याची राहुल गांधी यांना पर्वा नसते, पण यातून ते काँग्रेसला मूठमाती देण्याचे काम करत आहेत. त्याची थट्टा त्यांचे मित्रपक्ष आणि भाजप विरोधक करून काँग्रेसला संपवण्यासाठी उत्तेजन देत आहेत. अशा परिस्थितीत कितीही अवहेलना झाली, तरी प्रादेशिक काँग्रेस नेत्यांना अपमान सहन करत राज्य सरकारमध्ये राहण्याची कसरत करावी लागत आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …