ैअमेरिकन सिंगर ब्रिटनी स्पियर्सला पित्याच्या कंझरव्हेटरशीपमधून अखेर स्वातंत्र्य मिळाले आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर अखेरीस कोर्टाने ब्रिटनीचे पिता जेम्स स्पियर्सचे कंझरव्हेटरशीप म्हणजे संरक्षण संपुष्टात आणले आहे. या कारणावरून ब्रिटनी आणि तिच्या पित्याचा बºयाच काळापासून कायदेशीर लढा सुरू होता.
ब्रिटनी २००८ पासून कायदेशीररीत्या पित्याच्या संरक्षणाखाली होती. म्हणजे ब्रिटनी आपल्या वडिलांच्या मर्जीशिवाय ना एक पैसा खर्च करू शकत होती आणि ना खासगी किंवा व्यावसायिक आयुष्यात स्वत:चे निर्णय घेऊ शकत होती. बुधवारी सुपिरिअर कोर्टाचे जज ब्रेंड पेनी यांनी आपल्या आदेशाद्वारे जेम्स स्पियर्स यांचे कंझरव्हेटरशीप अखेर संपवले आहे.
या विजयामुळे अर्थातच ब्रिटनी तर कमालीची खूश आहेच, परंतु त्याचबरोबर तिच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते सातत्याने ब्रिटनीच्या स्वातंत्र्याची मागणी करत होते.
अमेरिकन कायद्यांतर्गत कंझरव्हेटरशीपमध्ये वृद्धापकाळ किंवा शारीरिक अथवा मानसिक समस्यांमुळे एखाद्या व्यक्तीच्या पैशांशी निगडित प्रकरणे किंवा दैनंदिन जीवन व्यवस्थापनाकरिता एक संरक्षक म्हणजे कंझरव्हेटर नियुक्त केला जातो. २००८ मध्ये ब्रिटनीने फेडरलाईनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आपली मानसिक अवस्था ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यादरम्यान ब्रिटनीवर अंमली पदार्थ सेवनाचे आरोपही लावण्यात आले. त्यावेळी तिचे पिता जेम्स यांनी तिच्या कंझरव्हेटरशीपसाठी कोर्टात अर्ज केला होता व तो मान्यही करण्यात आला होता.