नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे पुढील प्रशिक्षक बनण्यास सज्ज माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी मंगळवारी या पदासाठी औपचारिक रूपात अर्ज दाखल केला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)चे सध्याचे प्रमुख द्रविड यांच्या अर्जाने क्रिकेट सल्लागार समितीचे काम सोप्पे झाले, कारण त्यांच्या एवढ्या दिग्गजाचे नाव सध्या तरी शर्यतीत नाही. असे कळते की, ते बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा यांची पहिली पसंती आहे.
बीसीसीआयच्या एका सीनिअर अधिकाऱ्याने मंगळवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, राहुलने औपचारिक रूपात अर्ज दाखल केला, कारण मंगळवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. एनसीएमधील त्यांच्या संघातील गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा यांनी अगोदरच अर्ज केला आहे. द्रविड यांनी नुकतेच दुबईमध्ये आयपीएल फायनलच्या रूपात बीसीसीआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गांगुली व शहा यांनी पुन्हा एकदा आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर पद सांभाळण्यास सांगितले. द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारतीय क्रिकेटच्या नव्या काळाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्ध स्थानिक मालिकेनं होईल, ज्यावेळी ते नव्या टी-२० कर्णधारासोबत आपला पदभार सांभाळतील. भारताचे माजी महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण एक वेळ पुन्हा एनसीए प्रमुखाच्या शर्यतीत आहेत. सूत्रांकडून असे कळते की, लक्ष्मण आता आयपीएल संघ सनरायजर्स हैदराबादचे मेंटॉर नसतील. अशात त्यांची निवड झाल्यास त्यांना कमेंट्री व कॉलम लिहिण्याचे कामही सोडावे लागेल. भारतीय क्रिकेटच्या हितासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक व एनसीए प्रमुख एकत्रितपणे काम करतील. द्रविड व लक्ष्मण दक्षिण क्षेत्रासाठी स्थानिक क्रिकेट खेळले असून, ते एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. लक्ष्मण यांनी या पदावर अद्याप आवड दाखवलेली नाही, पण बीसीसीआय पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधेल. त्यांचा नकार कायम राहिल्यास अनिल कुंबळे यांचे नाव शर्यतीत येईल; पण आता हे पाहावे लागेल की, बोर्ड कोणाला आपली पहिली पसंती दर्शवतो.