अक्षर-अश्विनच्या फिरकीसमोर न्यूझीलंड गारद

 

  •  भारताकडे ६३ धावांची आघाडी

कानपूर – डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या पाच विकेटच्या मदतीने भारताने पहिल्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गारद केले. दरम्यान, दुसऱ्या डावात यजमानांनी सलामी फलंदाज शुभमन गिलचा विकेट लवकर गमावला. तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्यावर भारताची धावसंख्या १ बाद १४ धावा होती व त्यांनी एकूण ६३ धावांची आघाडी मिळवली आहे.
गिल दुसऱ्याच षटकात एका धावेवर काइल जैमिसनचा शिकार झाला. चेतेश्वर पुजारा नऊ व मयंक अग्रवाल चार धावा करत खेळत आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय गोलंदाजांच्या नावे राहिला. न्यूझीलंडची धावसंख्या एक वेळ १ बाद १९६ धावा होती, पण नंतरचे नऊ गडी शंभर धावांच्या आत गडगडले. अक्षरने दुसऱ्या सत्रात चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंडवर दबाव निर्माण केला. त्याने अखेरच्या सत्रात देखील दोन विकेट मिळवल्या. भारताला सामन्यात पुनरागमन मिळवून देण्याचे श्रेय उमेश यादवला जाते, ज्याने ठीक लंचआधी केन विलियमसनला स्वस्तात माघारी पाठवत यजमानांना मोकळा श्वास घेण्याची संधी दिली. अक्षरने ३४ षटकांत ६२ धावा देत पाच विकेट मिळवल्या. त्याने दुसऱ्या सत्रात १३ धावांच्या आत रॉस टेलर (११), हेन्री निकोल्स (दोन) व टॉम लॅथम (२८२ चेंडूंत ९५ धावा) यांना माघारी धाडले. अखेरच्या सत्रात टॉम ब्लंडेल (१३) व टिम साऊदी (पाच) यांना त्रिफळाचीत केले. अश्विनने ४२.३ षटकांत ८२ धावा देत तीन विकेट मिळवल्या. रवींद्र जडेजाने रचिन रवींद्र (१३)ला बाद केले, त्याआधी उमेशने दुसऱ्या नव्या चेंडूने यश प्राप्त केले व ऑफ स्टम्पवर जाणाऱ्या चेंडूला विलियमसनला चकवत पायचीत केले. त्याने ६४ चेंडूंत १८ धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्या सत्रात ६८ धावा केल्या. सलामी फलंदाज विल यंग पहिल्या कसोटीत शतक ठोकण्यापासून चुकला व २१८ चेंडूंत ८९ धावांच करू शकला. तो अश्विनचा शिकार ठरला. त्यानंतर अश्विनने यंगला सब्स्टीट्युट यष्टीरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. यंग व लॅथमने पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी रचली. यंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करताना १५ चौकार झळकावले.

दुसऱ्या सत्रात अक्षरने शानदार गोलंदाजी केली व अत्यंत सुंदर चेंडूवर टेलरला पुढे येण्यास बाध्य केले व ज्याचा झेल यष्टीमागे भरतनेच टिपला. निकोल्स स्वीप शॉट मारण्याच्या नादात पायचीत झाला, तर लॅथमला पुढे येत खेळण्याची शिक्षा भोगावी लागली, जिथे भरत यष्टीरक्षण करण्यापासून चुकला नाही. पहिल्या सत्रात अश्विन व अम्पायर नितीन मेनन यांच्यात वाद झाला. याआधी अश्विन जेव्हा विलियमसनला गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या फॉलोथ्रूबाबत मेनन यांनी हरकत घेतली. अश्विन फॉलोथ्रूमध्ये ‘डेंजर एरिया’ मध्ये जात होता व अम्पायर्सने त्याला अनेकदा इशारा दिला. अम्पायरचे म्हणणे होते की, अश्विन वारंवार समोर आल्यास आम्हाला निकाल देताना अडचणी येतील, कारण अशाने आम्हाला काहीच दिसणार नाही. अश्विन व कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे प्रकरण सोडवण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …