अंबरनाथमध्ये परदेशातून आलेल्या सात वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण

 

  • होणार ओमिक्रॉनची तपासणी

अंबरनाथ – ओमिक्रॉनमुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. लॉकडाऊनच्या धक्क्यातून सावरत असलेल्या सर्व सामान्य माणसाला पुन्हा एकदा ओमिक्रॉनच्या चर्चेने धाकधुक वाढवली आहे. सुदैवाने महाराष्ट्रात अद्याप ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले नसले, तरी परदेशगमन करून आलेल्या प्रवाशांबाबत सतर्कता बाळगली जात आहे. खासकरून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. या सर्व घडामोडीत अंबरनाथ शहरात कुटुंबासह परदेशात जाऊन आलेल्या एका सात वर्षांच्या लहान मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.
शेजारील राज्य कर्नाटकात दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची बातमी गुरुवारीच वाऱ्यासारखी पसरू लागली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सतर्कतेची पावले उचलायला सुरुवात केली आहे. आता अंबरनाथमधील संबंधित मुलगी आई-वडिलांसह रशियाला सुट्ट्यांसाठी गेली होती. २८ नोव्हेंबरला हे कुटुंब रशियाहून अंबरनाथला दाखल झाले. त्यानंतर काही दिवसात मुलीला त्रास होऊ लागल्याने चाचणी केली असता ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मुलीचे वडील निगेटिव्ह असून, तिच्या आईच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह मुलीचे नमुने ओमिक्रॉन तपासणीसाठी शुक्रवारीच पाठवण्यात येणार असल्याचे कळते. सध्या मुलगी व तिचे कुटुंबीय घरीच क्वारंटाईन झाले असून, त्यांची इमारत सील करणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …