अंडे का फंडा’ : थंडीची चाहूल लागताच मुंबईकरांचा अंड्यावर ताव, दरही वधारले

मुंबई – नोव्हेंबर महिन्यात अनेक वेळा वातावरणात बदल पाहण्यास मिळाला. अशात पावसाच्या हजेरीमुळे राज्यातील थंडीने थोडा ब्रेक घेतलेला, पण आता हळूहळू थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांचा अंड्यावरही ताव वाढला असून, अंड्यांच्या अधिकच्या मागणीमुळे ठोक बाजारात ५०० रुपये शेकडा, तर किरकोळ बाजारात अंड्याचे दर चक्क ६५० रुपये शेकड्यांवर पोहचले आहे. याचा अर्थ असा की, ठोक बाजारात १०० अंड्यामागे ५० तर किरकोळ बाजारात १५० रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. हिवाळी मौसमात अंड्यांची विक्री जोरदार असते. यंदा मात्र नोव्हेंबरमधील हवामान बदलामुळे लोकांनी अंड्यांकडे पाठ फिरवली होती, मात्र डिसेंबर महिन्याला सुरुवात होताच दररोजच्या मागणीत ४० लाख अंड्यांची वाढ झाली आहे. सध्या दिवसाकाठी ७८ लाख अंडी विक्री होत असल्याचे मुंबई एग्ज असोसिएशनचे अध्यक्ष अफताफ खान यांनी सांगितले. आता मागणी स्थिरावली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत असेच दर राहतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये हैदराबाद, कर्नाटक या राज्यांतून तर महाराष्ट्राच्या विविध भागांतून अंड्याची मागणी व्यापारी करीत असतात. यावर्षीही अंड्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने नोव्हेंबरपर्यंत दर हे घसरलेलेच होते, पण डिसेंबर महिन्यात हे दर वाढले आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून आवक होतच आहे पण राज्यातील पुणे, सांगली, जिल्ह्यांतील पोल्ट्रीमधूनही अंड्यांची आवक ही मुंबईत सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्यावर्षी कोरोना काळात किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अंड्यांची मागणी वाढली होती. दररोज ८० ते ९० लाख अंड्यांची विक्री होत होती. प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी अंड्यांवर ताव मारण्यास सुरुवात केलेली. सध्या किरकोळ बाजारात एक डझन अंड्यासाठी ग्राहकांना ७२ रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच एक अंड हे ६ रुपयांला पडते, तर नोव्हेंबरमध्ये एक डझन अंडी ६५ रुपयाला मिळत होती. दरवर्षी थंडीची चाहूल लागताच दरात असे चढ-उतार पाहावयास मिळतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …