भारत-इंग्लंड कसोटी मालिका : गोलंदाजांचे वर्चस्व!

इंग्लंड पहिल्या डावात अद्याप १३८ धावांनी पिछाडीवर असून डेव्हिड मलान २६ आणि क्रेग ओव्हर्टन १ धावेवर खेळत आहे.

भारताच्या हाराकिरीत शार्दूलचे धडाकेबाज अर्धशतक; बुमराचा भेदक मारा

लंडन : ओव्हलच्या खेळपट्टीवर गुरुवारी वेगवान गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शार्दूल ठाकूरच्या (३६ चेंडूंत ५७ धावा) धडाकेबाज अर्धशतकानंतरही इंग्लंडच्या वेगवान चौकडीपुढे भारताचा पहिला डाव १९१ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही भेदक मारा करून पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ५३ अशी अवस्था केली.

इंग्लंड पहिल्या डावात अद्याप १३८ धावांनी पिछाडीवर असून डेव्हिड मलान २६ आणि क्रेग ओव्हर्टन १ धावेवर खेळत आहे. जसप्रीत बुमराने सलामीवीर रॉरी बर्न्‍स (५) आणि हसीब हमीद (०) यांना एकाच षटकात माघारी पाठवल्यावर उमेश यादवने धोकादायक जो रूटचा (२१) त्रिफळा उडवून चाहत्यांना दिलासा दिला.

प्रथम फलंदाजी करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी आठ षटकांत २८ धावा काढून सावध सुरुवात केली. परंतु ख्रिस वोक्सने रोहितचा (११) अडसर दूर केला. दुसऱ्या बाजूने ऑली रॉबिन्सनने राहुलला (१७), तर जेम्स अँडरसनने चेतेश्वर पुजाराला (४) तंबूची वाट दाखवली.

रवींद्र जडेजाला पाचव्या क्रमांकावर पाठवण्याचा डावही फसला. जडेजा (१०) वोक्सचा दुसरा बळी ठरला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आठ चौकारांसह सलग दुसरे आणि कारकीर्दीतील २७वे अर्धशतक झळकावले; परंतु रॉबिन्सनने त्याला माघारी पाठवून भारताला सावरू दिले नाही. क्रेग ओव्हर्टनने अजिंक्य रहाणेला (१४) बाद करून भारताला सहावा धक्का दिला.

मुंबईकर शार्दूलने सात चौकार, तीन षटकारांच्या आतषबाजीसह दुसरे कसोटी अर्धशतक साकारले. त्याने उमेशच्या साथीने ६३ धावांची भागीदारी रचल्यामुळे भारताला किमान पावणेदोनशे धावांचा पल्ला गाठता आली.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी गुरुवारी दंडावर काळ्या रंगाची फीत बांधून माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांना आदरांजली वाहिली.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ६१.३ षटकांत सर्व बाद १९१ (शार्दूल ठाकूर ५७, विराट कोहली ५०; ख्रिस वोक्स ४/५५)

’ इंग्लंड (पहिला डाव) : १७ षटकांत ३ बाद ५३ (डेव्हिड मलान खेळत आहे २६, जो रूट २१; जसप्रीत बुमरा २/१५)

१ कोहलीने (४९० डाव) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २३,००० धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान मिळवले.

५७ शार्दूल ठाकूर

चेंडू ३६

चौकार ७

षटकार ३

About admin

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *