पुरुषांत बी.पी., महिलांत शिवशक्तीने पटकावले जेतेपद


भाऊसाहेब भिलारे चषक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी

पांचगणी – भारत पेट्रोलियम आणि शिवशक्ती यांनी पांचगणी व्यायाम मंडळ आयोजित अनुक्रमे पुरुष व्यावसायिक आणि महिला गटात अजिंक्यपद पटकावले. प्रतिभावंत खेळाडूंचा भरणा असलेल्या भारत पेट्रोलियम संघाला गेली जवळपास दोन-अडीच वर्षे विजेतेपद हुलकावणी देत होते. अखेरीस त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. भारत पेट्रोलियमचा अजिंक्य पवार पुरुषांत सर्वोत्तम खेळाडू ठरला, तर शिवशक्तीची रेखा सावंत महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. पांचगणी येथील बाळासाहेब भिलारे क्रीडानगरीत झालेल्या व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलिमने मुंबई बंदरचा दुबळा प्रतिकार ३४-०९ असा संपवित ‘भाऊसाहेब भिलारे चषक’ आणि रोख रुपये एक लाख अकरा हजार एकशे दहा (रु.१,११,११०/-) आपल्या नावे केले. उपविजेत्या मुंबई बंदरला चषक व रोख रु. पासष्ट हजार(रु ६५,०००/-) वर समाधान मानावे लागले.
व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलिमने मुंबई बंदरचा (बीपीटी) दुबळा प्रतिकार ३४-०९ असा मोडीत काढला. व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यातील पूर्वार्धातच अजिंक्य पवारच्या तुफानी चढायांवर पेट्रोलियम संघाने २ लोण चढवत २४-०४ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम ठेवत २३ गुणांनी सामना आपल्या खिशात टाकला. साखळी व बाद फेरीच्या सामन्यात दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठणारा मुंबई बंदरचा संघ अंतिम सामन्यात मात्र अगदीच दुबळा ठरला.
महिलांच्या अंतिम फेरीत शिवशक्तीने सुरुवात आक्रमक करत स्वराज्यवर लोण देत पहिल्या डावात १६-०८ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात देखील शिवशक्तीने ४ खेळाडू उरले असताना रेखा सावंतने एका चढाईत ३ गडी टिपत स्वराज्यवर आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्तीने उपनगरच्या स्वराज्य मंडळाला ३०-१७ असे रोखत भाऊसाहेब भिलारे चषकासहित रोख रु. ५१ हजार खिशात टाकले. उपविजेत्या स्वराज्य मंडळाला ३० हजारावर समाधान मानावे लागले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …