टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : प्रमोद उपांत्य फेरीत

सुहास याथिराज, तरुण ढिल्लाँ, कृष्णा नागर यांनी आपापल्या अभियानाचा विजयी प्रारंभ केला.

टोक्यो : भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने गुरुवारी पदकाच्या दिशेने वाटचाल करताना टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. सुहास याथिराज, तरुण ढिल्लाँ, कृष्णा नागर यांनी आपापल्या अभियानाचा विजयी प्रारंभ केला.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या प्रमोदने ‘अ’ गटाच्या एसएल-३ श्रेणीतील अखेरच्या साखळी सामन्यात युक्रेनच्या अलेक्झांडर चेरीकोव्हला २१-१२, २१-९ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. शुक्रवारी मिश्र दुहेरीत प्रमोद पलक कोहलीच्या साथीने सिरिपोंग टीमारोम आणि निपदा सेनसुपा यांच्याशी दोन हात करणार आहे.

पुरुष एकेरीच्या अन्य लढतींमध्ये सुहासने (एसएल-४) जर्मनीच्या निकोलस पॉटचा २१-९, २१-३ असा सहज धुव्वा उडवला. २७ वर्षीय तरुणने (एसएल-४) थायलंडच्या सिरिपोंग टीमारोमवर २१-७, २१-१३ असे वर्चस्व गाजवले. कृष्णाने (एसएच-६) मलेशियाच्या टेरस दिदिनवर २२-२०, २१-१० अशी मात केली.

महिला एकेरीतील दुसऱ्या साखळी सामन्यात पलकने (एसयू-५) टर्कीच्या झेहरा बॅग्लरला २१-१२, २१-१८ असे नमवले. परंतु पहिल्या लढतीत पराभव पत्करल्यामुळे तिला पुढील वाटचालीसाठी अन्य निकालांवर अवलंबून राहावे लागेल.

आज मी सर्वोत्तम खेळ केला. चेरीकोव्हचा बचाव चांगला आहे. परंतु त्याच्यासारख्या कडव्या प्रतिस्पध्र्यावर मात करून उपांत्य फेरी गाठल्याने मी समाधानी आहे. मिश्र दुहेरीतसुद्धा चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे. – प्रमोद भगत

गोळा फेक : अरविंद सातव्या क्रमांकावर

टोक्यो : भारताचा गोळाफेकपटू अरविंदला पुरुषांच्या एफ-३५ श्रेणीतील अंतिम फेरीत पदक मिळवण्यात अपयश आले. कारकीर्दीतील पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या २८ वर्षीय अरविंदने १३.४८ मीटरच्या सर्वोत्तम गोळाफेकीसह सातवे स्थान मिळवले.

नेमबाजी : राहुल पाचव्या स्थानी

टोक्यो : भारताच्या राहुल जखारला पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या एसएच-१ श्रेणीत पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. ३५ वर्षीय राहुलने एकूण ५७६ गुण मिळवले. आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. अन्य स्पर्धक आकाशने पात्रता फेरीत ५५१ गुणांसह २०वा क्रमांक मिळवला. त्यामुळे त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही. पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला आतापर्यंत दोन पदके मिळाली आहेत.

कॅनोइ : प्राची उपांत्य फेरीत

टोक्यो : भारताच्या प्राची यादवने कॅनोइ क्रीडा प्रकारातील महिला एकेरीच्या २०० मीटरच्या शर्यतीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भोपाळ येथील २६ वर्षीय प्राचीने १:११.९८ मिनिट इतकी वेळ नोंदवली. शुक्रवारी या शर्यतीची उपांत्य फेरी रंगणार आहे

About admin

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …

Leave a Reply

Your email address will not be published.